
घरच्यांकडून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेयसीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर प्रेयसीच्या दशक्रियेदिवशीच प्रियकरानेही लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना पारनेर तालुक्यातील देसवडे येथे घडली आहे. याप्रकरणी पारनेर पोलिसांत सध्यातरी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
पारनेर तालुक्यातील मुळा नदीच्या कडेला असलेल्या देसवडे येथे ही घटना घडली. या दोघांचे गावातच प्रेम जुळले. मुलीच्या घरच्यांना ही गोष्ट माहीत होताच त्यांनी तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेतला. त्यामुळे प्रियकराचा विरह सहन न झाल्याने ती घर सोडून निघून गेली. याप्रकरणी तिच्या घरच्यांनी तरुणी बेपत्ता असल्याची खबर पारनेर पोलीस ठाण्यात नोंदविली. याप्रकरणी या तरुणावर संशय असल्याने पारनेर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलाविले; परंतु नंतर लगेच सोडूनही देण्यात आले. दोन दिवसांनी गावातील एका शेतळ्यामध्ये मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. पारनेर पोलिसांनी पंचनामा व उत्तरीय तपासणी करून ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली.
गेल्या 10 ते 12 दिवसांत मोठय़ा प्रमाणावर याप्रकरणी घडामोडी घडल्या. घटनेतील तरुणाला मोठा मानसिक त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून की मुलीच्या विरहामुळे त्याने आत्महत्या केली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेतील तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये तीन स्थानिकांची नावे असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक फौजदार बी. बी. भोसले यांनी दिली. यासंबंधी कोणी फिर्याद दिली तर या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पारनेर पोलिसांनी सांगितले आहे.
गावगुंडांनी प्रियकराला ब्लॅकमेल करीत लिहून घेतली जमीन
देसवडेतील प्रेमकहाणीचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर ‘ते मिटवायचे असेल, तर तुझ्या वडिलांच्या नावे असलेली एक एकर जमीन लिहून दे,’ अशी गळ स्थानिक गावगुंडांनी प्रियकराला घातली. त्यानुसार प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली गावगुंडांनी ही जमीन त्रयस्त व्यक्तीच्या नावे खरेदी करून घेतली. त्याला मोठय़ा प्रमाणात त्रासही दिला. प्रियकराने ‘प्रेयसीचे बरेवाईट झाल्यास मीपण आत्महत्या करेन,’ अशी धमकीही चौकशीदरम्यान टाकळी पोलिसांसमोर दिली होती. अखेर या मुलीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.




























































