
सामना ऑनलाईन । भोपाळ
उत्तर प्रदेशातील अलिगड येथील एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून मुंबईत मॉडेलिंग करणाऱ्या एका तरुणीला शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून भोपाळ येथे एका फ्लॅटमध्ये ओलीस धरले आहे.
त्या तरुणीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी पोलीस गेले काही तास शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र त्या तरुणाने स्वतःला रक्तबंबाळ करून घेतले आहे. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि धारदार कैची आहे. गोळी झाडून आत्महत्या करण्याची आणि त्या तरुणीलाही ठार मारण्याची धमकी तो पोलिसांना देत आहे. त्यामुळे त्या तरुणीची सुटका करायची कशी, या पेचात पोलीस सापडले आहेत. पोलीस त्याच्याशी व्हिडीओ कॉलिंग करून बोलणी करत आहेत.
त्या तरुणाचे नाव रोहित असे असून तोही मुंबईत मॉडेलिंग करत होता. त्यावेळी त्याची मॉडेलिंग करणाऱ्या त्या तरुणीशी ओळख झाली होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असून तिच्याशी लग्न करण्याच्या हट्टाने तो पेटला आहे. त्याने ओलीस धरलेली तरुणी ही ‘बीएसएनएल’च्या एका माजी अतिरिक्त महाव्यवस्थापकाची कन्या आहे.
इमारतीभोवती मीडिया, लोकांची गर्दी
भोपाळच्या मिसरौद या भागातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रोहित याने त्या तरुणीला ओलीस धरले आहे. त्या इमारतीभोवती मीडिया आणि लोकांनी तोबा गर्दी केली आहे. त्या तरुणाने एका पोलिसाला आणि त्या तरुणीलाही जखमी केलेले आहे. त्याने जारी केलेल्या व्हिडीओत त्या फ्लॅटमध्ये जागोजागी रक्ताचे डाग दिसत आहेत.






















































