लोअर परळ पुलाच्या गर्डरसाठी सलग पाच दिवस नाईट ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोअर परळचा डिलाईल पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी मध्यरात्रीपासून सलग पाच दिवस रात्रकालिन ब्लॉकचे आयोजन केले आहे. रविवारी रात्री 1.25 वा. ते पहाटे 4.55 वा. दरम्यान साडेतीन तासांचा नाईट ब्लॉक घेऊन हे अभियांत्रिकी काम सलग पाच रात्र चालणार आहे.

लोअर परळ (डिलाईल) पुलाला धोकादायक ठरवून पाडण्यात आल्यानंतर गेली तीन वर्षे त्याचे काम सुरू आहे. कोरोनाच्या लाटेमुळे ऑक्सिजन सिलिंडर टंचाई अभावी 2020 पासून या पुलाचे काम रखडले आहे. या पुलाच्या गर्डरच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. आता नव्याने गर्डर टाकण्याचे काम रविवार रात्रीपासून सुरू करण्यात आले आहे. सलग पाच दिवस नाईटब्लॉक घेण्यात येऊन हा गर्डर सरकविण्याचे काम चालणार आहे. त्यामुळे रात्री व पहाटे प्रवास करणाऱया प्रवाशांना परेचे नवे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे.

या लोकल उशिरा सुटतील

विरार ते चर्चगेट लोकल विरारहून दहा मिनिटे उशिरा 3.35 वा. सुटेल. बोरिवली ते चर्चगेट लोकल बोरिवलीहून तीन मिनिटे उशिरा 4.11 वा. सुटेल, भाईंदर येथून चर्चगेट लोकल पाच मिनिटे उशिरा 4.10 वा. सुटेल, चर्चगेटहून 4.40 वा. सुटणारी विरार लोकल मुंबई सेंट्रल येथे पाच मिनिटे नियंत्रित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पहाटे व रात्रीच्या लोकल वेळांत बदल

विरार ते चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली असून विरारहून रा.12.05 वा.चर्चगेटकरिता जादा जलद लोकल चालविण्यात येणार आहे. ही लोकल बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रलवर थांबा घेईल. तर पहाटेची 4.15 वा. चर्चगेटहून विरारला जाणारी लोकल चर्चगेट ते दादर दरम्यान रद्द केली असून ती दादर ते विरार दरम्यान चालविण्यात येईल. चर्चगेटहून पहाटे 4.38 वा. सुटणारी बोरिवली लोकल चर्चगेट आणि वांद्रे दरम्यान रद्द करण्यात येऊन ती वांद्रे ते बोरिवली दरम्यान चालविण्यात येईल. चर्चगेट येथून पहाटे 4.19 वा. सुटणारी बोरिवली लोकल, बोरिवली येथून 5.31 वा. सुटणारी चर्चगेट लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.