लखनौ-बंगळुरूमध्ये आज ‘कांटे की टक्कर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंटस् संघापुढे उद्या मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कडवे आव्हान असेल. लखनौने मागील लढतीत मुंबई इंडियन्सचा पराभव केलाय, तर बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारलेली आहे. उभय संघांनी सहा लढतींमध्ये 8 गुणांची कमाई केलेली आहे. त्यामुळे विजयाची लय कायम राखण्यासाठी उभय संघांमध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ‘काँटे की टक्कर’ बघायला मिळणार आहे.

बंगळुरूकडे चांगले गोलंदाज

जोश हेजलवुडने दिल्लीविरुद्ध सुरेख स्पेल टाकून सामना बंगळुरूच्या बाजूने झुकविला होता. ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाला लखनौविरुद्धही तिखट गोलंदाजी करावी लागणार आहे. श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या कामगिरीवरही बरेच काही अवलंबून असेल. शिवाय डेथ ओव्हरमधील विशेषतज्ञ हर्षल पटेललाही लखनौविरुद्ध अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे.

आघाडीच्या फळीला खेळावे लागेल

बलाढय़ लखनौचा विजयरथ रोखायचा असेल तर बंगळुरूच्या आघाडीच्या फळीला आता खेळावे लागणार आहे. सलामीच्या लढतींनंतर कर्णधार फाफ डूप्लेसिसची बॅट पुन्हा चालली नाही. सलामीवीर अनुज रावतच्याही फलंदाजीत सातत्य नाही. विराट कोहलीलाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र दिनेश कार्तिक व ग्लेन मॅक्सवेल या मॅचविनर फलंदाजांमुळे लखनौच्या गोटातही थोडी दहशत नक्की असणार. या दोघांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे बंगळुरूचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आलाय.

लखनौकडे समतोल संघ

कर्णधार लोकेश राहुलने मुंबईविरुद्ध शतक ठोकल्याने लखनौ संघातील उत्साह दुणावला आहे. मात्र त्याच्यापुढे हर्षल पटेलचे आव्हान असेल. क्विंटॉन डिकॉकही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयुष बदोनी, दीपक हुड्डा व कृणाल पंडय़ा यांच्यामध्येही सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. जेसन होल्डर व मार्कस स्टोइनिसमुळे लखनौकडे खोलवर फलंदाजी आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान व फिरकीपटू रवी बिश्नोई यांच्या कामगिरीवरही लखनौचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

संभाव्य उभय संघ

लखनौ सुपर जायंटस् ः लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, कृणाल पंडय़ा, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, जेसन होल्डर, आवेश खान, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः फाफ डुप्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेजलवुड.