मढीतील कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळ निवड; धर्मादाय उपायुक्तांच्य निवडींना हरकत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील मढी देवस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची निवड धर्मादाय उपायुक्त एच. के. शेळके यांनी जाहीर केली असून, यामध्ये मढी गावातील सहा तर राज्यातून पाचजणांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या निवड प्रक्रियेला देवस्थानचे माजी उपाध्यक्ष सुनील सानप यांनी हरकत नोंदवली असून, यावर 8 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तांचे हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मढी येथे नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे. वर्षभर भाविक नाथांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मढी देवस्थान सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, यापूर्वीच्या विश्वस्त मंडळात दोन गट पडले होते. त्यामुळे दोन्हीही गटांनी आपले स्वतंत्र पदाधिकारी निवडल्याने देवस्थान एक मात्र अध्यक्ष व इतर पदाधिकारी दोन असे चित्र निर्माण झाले होते. या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने नवीन निवडी करण्यात आल्या आहेत. मढी येथील मरकड बेटातून सहा विश्वस्त निवडायचे होते. त्यासाठी 41 जणांनी, तर राज्यातून निवड करण्यात येणाऱ्या पाच विश्वस्तांसाठी 102 जणांनी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान, या संपूर्ण निवड प्रक्रियेला माजी अध्यक्ष सुनील सानप यांनी हरकत घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मढी गावातून निवडले जाणारे सहा विश्वस्त बहुमताच्या जोरावर त्यांना हवे तसे निर्णय घेतात. त्यामुळे इतर विश्वस्तांना कारभार करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या याचिकेवर 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

एकाही जुन्या चेहऱयाला स्थान नाही!
जुन्या एकाही चेहऱ्याला या निवडीत स्थान देण्यात आलेले नसून, नव्या निवडीत जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती अर्जुन शिरसाठ यांच्यासह अॅड. शिवाजी डोके, सचिन गवारे, तानाजी ढसाळ व मढी येथीलच रवींद्र आरोळे यांची सर्वसाधारणमधून निवड करण्यात आली आहे. तर, मढी गावातून डॉ. विलास मरकड, विमल मरकड, भाऊसाहेब मरकड, राधाकिसन मरकड, श्यामराव मरकड, संजय मरकड या सहाजणांचा समावेश आहे.