मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, पण शिवराज सरकारची डोकेदुखी कायम; काँग्रेसकडून भाजपवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशच्या पोट निवडणुकांच्या 53 दिवसांनंतर रविवारी अखेर कॅबिनेटचा तिसरा विस्तार झाला. मात्र असे असले तरी शिवराज सरकारची डोकेदुखी अद्याप संपलेली नाही. राज्‍यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक तुलसीराम सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यानंतर देखील कॅबिनेटमध्ये चार मंत्री पद अजून रिकामे आहेत. तर भाजपचे वरिष्ठ आमदार अजूनही मंत्री बनणण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर दबाव टाकून होते, मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. ‘आजतक’ने यासंदर्भातील वृत्तप्रसिद्ध केलेले आहे.

गेल्यावर्षी मार्च मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपले 22 समर्थक आंदोलकांसोबत काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि 15 महिन्यात भाजप सरकारमध्ये परतण्याचा रस्ता खुला झाला. मग शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आणि सरकार सिंधिया यांच्यासोबत आलेल्या आमदारांचा दबदबा पाहायला मिळाला. अशाप्रकारे शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात सिंधिया समर्थक एकूण 14 आमदारांना मंत्री आणि राज्यमंत्री बनवले होते.

चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना शिवराज सिंह यांच्यासह,5 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये गोविंद सिंह राजपूत आणि तुलसी सिलावट सहभागी होते मात्र 6 महिन्यात निवडणूक न घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.

विधानसभेच्या 28 जागांवर नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत सिंधिया समर्थक नेत्यांनी निवडणूक लढवली. सिंधिया यांच्या गटातील मंत्री इमरती देवी, गिर्राज दंडोतिया आणि एंदल सिंह कंषाना निवडणुकीत पराभूत झाले अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे 5 मंत्री पद रिकामे झाले होते आणि एक मंत्री पद पहिल्यापासून रिकामे होते. अशा प्रकारे शिवराज कॅबिनेटमध्ये एकूण 6 मंत्री पद रिकामे होते, मात्र रविवारी फक्त दोन आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ दिली गेली.

भाजपच्या ज्या आमदारांची नावे चर्चेत होती त्यापैकी कुणालाही संधी मिळालेली नाही. शिवराज सरकारमध्ये आतापर्यंत 11 सिंधिया समर्थकांना स्थान मिळाले आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावान नाराज असल्याचे कळते आहे. आता पुढलेल्या चार जागांवर कुणाला स्थान द्यावे यावरून शिवराज सरकारची डोकेदुखी वाढली असल्याचे आजतकच्या एका वृत्तात म्हटले आहे.

काँग्रेस नेते नरेंद्र सलूजा म्हणाले की, ‘जेव्हा मंत्रिमंडळात 6 पद रिकामे होते, तेव्हा सिंधिया समर्थक दोन आमदारांचाच विचार करण्यात आला. भाजपमध्ये निष्ठावान आणि योग्यता असणारे अन्य नेते असतानाही त्यांना डावलले.  म्हणजे भाजपमध्ये निष्ठावान नेते कार्यकर्ते यांना बिलकूल स्थान नाही असे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.