
मध्य प्रदेशमधील बहुचर्चित ‘हनी ट्रॅप’ प्रकरणी इंदूर पोलिसांनी गुजरातमध्ये एकाला अटक केली आहे. इंदूरमधून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्राचा मालक जितू सोनी याला क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमध्ये बेड्या घातल्या. जितू सोनीविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्कार, मानव तस्करी आणि अन्य 56 गुन्हे दाखल आहेत. कमलनाथ सरकारने जितू सोनीविरोधात हे गुन्हे दाखल केले होते. आता शिवराज सरकारमध्ये त्याला अटक झाली आहे.
याआधी पोलिसांनी ‘सांझा लोकस्वामी’ या वृत्तपत्राचा मालक जितू सोनी याचा भाऊ महेंद्र सोनी याला गुजरातमधील अमरेली येथे अटक केले होते. महेंद्र सोनीवर कमलनाथ सरकारने 10 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. जितू सोनी याने केलेल्या गुन्ह्यात महेंद्र याला सहआरोपी बनवण्यात आले आहे. शिवराजसिंह चौहान, त्यांचे जवळचे सहकारी, भाजप नेते यांच्या तरुणींसोबतच्या कथित गप्पा वृत्तपत्रात छापल्याने तत्कालीन कमलनाथ सरकारने जितू सोनीविरोधात कारवाई केली होती.
जितू सोनी याने कथित गप्पांचा ऑडिओ वृत्तपत्राच्या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केला होता आणि यामुळे खळबळ उडाली होती. मध्यप्रदेश पोलिसांनी त्याच्यावर 1 लाख 60 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तत्कालीन कमलनाथ सरकारच्या काळात पोलिसांनी 31 नोव्हेंबर, 2019 ला हॉटेल माय होमसह अन्य ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी जितू सोनी फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
कठोर कारवाई
हनी ट्रॅपमुळे चर्चेत आलेल्या वृत्तपत्राच्या मालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात आली होती. इंदूर नगरपालिकेने वृत्तपत्राचे ऑफिस तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला अटक करण्यात अपयश आले होते. आता त्याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे.




























































