कमलनाथ सरकारची आज परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांच्या पळवापळवीमुळे अल्पमतात आलेल्या मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारला सोमवारी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 22 आमदारांच्या बंडखोरीमुळे कमलनाथ सरकारसाठी ही सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी बहुमत चाचणी घेण्याचा आदेश शनिवारी मध्यरात्री जारी करून मुख्यमंत्री कमलनाथ यांची झोप उडवली आहे.

मध्य प्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर लगेचच विश्वासदर्शक ठराव मांडून त्यावर मतदान घेतले जाणार आहे. मतदान केवळ बटण दाबून होईल. याच दिवशी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल व संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंगही केले जाईल, असे राज्यपालांच्या आदेशात म्हटले आहे.

ज्योतिरादित्य समर्थकांचे भवितव्य ठरणार
ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांचे भवितव्य ठरणार आहे. या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत. या आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केले तर बहुमतासाठी 104 आमदारांची गरज असेल. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे फेटाळले तर पक्षाकडून त्यांना व्हिप जारी केला जाईल. त्यानुसार आमदारांना सभागृहात हजर राहावे लागेल. आमदार हजर न राहिल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते.

आमदारांची ‘कोरोना स्क्रिनिंग’
पाच दिवस जयपूरला मुक्काम ठोकलेल्या काँग्रेसच्या 86 आमदारांपैकी 85 आमदार रविवारी भोपाळला परतले. त्यापाठोपाठ भाजपने 105 आमदारांना हरयाणातून भोपाळला आणण्याची तयारी सुरू केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची स्क्रिनिंग करण्यात आली.