महिला आमदाराला उद्योग मंत्र्यांचा त्रास, विधानसभेत फुटला अश्रूंचा बांध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या महिला आमदाराने आपल्या पक्षाच्या नेत्यावर शारीरिक छळवणुकीचा आरोप लावत सुरक्षेची मागणी केली आहे. भाजपच्या महिला आमदार निलम मिश्रा यांनी मध्यप्रदेशचे उद्योग मंत्री राजेंद्र शुक्ल यांच्यावर हा गंभीर आरोप केला. विधानसभेमध्ये आपल्यावरील शारीरिक हिंसाचाराची माहिती देताना निलम यांना अश्रू अनावर झाले होते.

निलम यांच्या आरोपांची गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी गंभीर दखल घेतली आहे. निलम मिश्रा यांना सुरक्षा पुरवण्यात येईल, अशी हमी गृहमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, आमदार निलम मिश्रा यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे उद्योग मंत्री राजेंद्र शुक्ल यांनी म्हटले आहे. निलम मिश्रा या मध्य प्रदेशमधील रिवा जिल्ह्याच्या आमदार आहेत. निलम यांनी यापूर्वीही राजेंद्र शुक्ल यांच्यावर शारीरिक छळाचे आरोप लावले आहेत. राजेंद्र शुक्ल आणि निलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा यांच्यामध्ये जुना वाद असल्याचीही माहिती मिळत आहे.

निलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा हे रिवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष आहे. भाजपचे नेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीतर्फे सरकाविरोधात आंदोलन करण्यात आल्याने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजेंद्र शुक्ल यांनी अभय मिश्रा यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल केलेल्या असून गृहमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.