
मध्य प्रदेशातील पोलीस दलाला हादरवून सोडणारी एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मलहारगढ पोलीस स्टेशन, ज्याला नुकताच देशातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनमध्ये नववा क्रमांक मिळाला होता, तेच आता बदनाम झाले आहे. कारण, याच स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एका निर्दोष विद्यार्थ्याचे बसमधून अपहरण केले आणि त्याला अंमली पदार्थ तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकवले, हे उच्च न्यायालयाने उघडकीस आणलेल्या पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे.
पोलिसांनी ज्याला ‘अंमली पदार्थांची मोठी अटक’ म्हणून मिरवले होते, तो प्रकार आता सत्तेचा घोर गैरवापर असल्याचे समोर आले आहे. यामुळे मंदसौरच्या पोलीस अधीक्षकांना (SP) थेट उच्च न्यायालयात हजर राहून, हे प्रकरण पूर्णपणे बनावट असल्याचे कबूल करावे लागले.
असा आहे घटनेचा तपशील
पीडित सोहन (वय 18 वर्ष), मलहारगढ येथील बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला 29 ऑगस्ट रोजी एका चालत्या बसमधून जबरदस्तीने खाली उतरवून नेण्यात आले. काही तासांनंतर, पोलिसांनी जाहीर केले की त्याला 2.7 किलो अफू सोबत पकडण्यात आले आहे. दुसऱ्याच दिवशी त्याला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले.
मात्र, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबात तर वेगळीच कहाणी समोर आली आहे.
इंग्रजी वृत्त संकेतस्थळावरून मिळालेल्या वृत्तानुसार पुरावे दर्शवतात की, घटनास्थळी कोणतेही अंमली पदार्थ किंवा जप्ती करण्यात आली नव्हती. फक्त साध्या वेशातील पोलिसांचे एक पथक बस थांबवते, विद्यार्थ्याला ओढून बाहेर काढतात आणि त्याला घेऊन गायब होतो.
यानंतर, सोहनच्या कुटुंबीयांनी 5 डिसेंबर रोजी अवैध अपहरण, चुकीची अटक आणि पुरावे बनावट केल्याचा आरोप करत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात धाव घेतली.
पोलीस अधीक्षकांची न्यायालयात कबुली
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने मंदसौरचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार मीना यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश दिले.
मीना यांनी कबूल केले की सोहनला मलहारगढच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बसमधून उचलले होते. प्रथम माहिती अहवालात (FIR) दाखवलेली अटकेची वेळ आणि ठिकाण व्हिडिओमध्ये कैद झालेल्या प्रत्यक्ष वेळ आणि ठिकाणाशी जुळत नाही.
हे संपूर्ण ऑपरेशन मलहारगढच्या एका हेड कॉन्स्टेबलच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वीच त्याला अवैध कोठडीत ठेवण्यात आले होते आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास करण्यात आला नव्हता.
या घटनेमुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला, जेव्हा मीना यांनी न्यायालयात यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केलेल्या, परंतु बसमध्ये चढलेल्या व्यक्ती हे मलहारगढ पोलीस स्टेशनचेच कर्मचारी असल्याचे कबूल केले, ज्यामुळे आधीचे सर्व दावे खोटे ठरले.
मीना यांनी न्यायालयाला सांगितले की त्यांनी विद्यार्थ्याला बसमधून ओढून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सहा मलहारगढ पोलिसांना निलंबित केले आहे आणि विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने आता या प्रकरणावर आपला निकाल राखून ठेवला आहे आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे.
ज्येष्ठ वकील हिमांशू ठाकूर म्हणाले, ‘न्यायालयाने सर्व पुरावे पाहिले आणि सोहनचे बसमधून अवैध अपहरण करून त्याला संध्याकाळी 5 वाजता 2.7 किलो अफूसह खोटा अटक केल्याचे मान्य केले. तो बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला एक हुशार विद्यार्थी आहे. मलहारगढ पोलिसांनी बेकायदेशीरपणे आणि कायद्याच्या बाहेर जाऊन काम केल्याचे एसपींनी कोर्टात मान्य केले. बसमधील माणसांना ओळखायला नकार देणाऱ्या अधिकाऱ्याचे म्हणणेही खोटे ठरले; ते सर्व पोलीस अधिकारीच होते.’
विशेष म्हणजे, मलहारगढ पोलीस स्टेशनने गेल्या महिन्यातच हिंदुस्थानातील सर्वोत्तम पोलीस स्टेशनमध्ये नववा क्रमांक मिळवून देशपातळीवर ओळख मिळवली होती, आता त्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.




























































