
रामनवमीच्या दिवशी हिंदुस्थानात अनेक राज्यांमध्ये हिंसाचार घडला. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 10 एप्रिल रोजी मध्य प्रदेशात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशातील दंगलग्रस्त सेंधवा शहरातील एका महिलेने सांगितले की, तिचा मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांवर 10 एप्रिलच्या रामनवमी हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे तिघेही खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली एक महिन्यापासून तुरुंगात आहेत. असे असतानाही त्यांच्यावर हिंसाचार प्रकरणी गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला आहे.
13 एप्रिल रोजी राज प्रशासनाने महिलेचा मुलगा शाहबाजच्या घराचा एक भाग देखील जमीनदोस्त केला. तुरुंगवास भोगत असून देखील खोट्या आरोपाखाली माझ्या मुलाला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांच्या म्हणन्यानुसार जर या कारवाईमध्ये कोणताही आधार न आढळल्यास ते एफआयआर रद्द करू शकतात.
सकीना बी या महिलेने शुक्रवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून अतिक्रमण किंवा बेकायदेशीर बांधकाम तोडण्याबद्दल कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.
एके दिवशी ते अचानक घर तोडण्यासाठी आले, यावेळी त्यांनी आम्हाला आमच्या घरातील सामान काढून टाकण्याचे आदेश दिले आणि 15 मिनिटांनंतर माझा मुलगा शाहबाजच्या घराचा भाग पाडला.
सेंधवा येथील जोगवारा रोड येथील रहिवासी असणाऱ्या सकिना यांनी सांगितले की, शाहबाज एका महिन्याहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत आहे. 10 एप्रिलच्या दंगलीत जाळपोळ केल्याप्रकरणी त्याच्यावर आणि त्याचे मित्र फखरू आणि रौफ यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिघेही तुरुंगात आहेत. घर तोडले जात असताना मी पोलिसांना अनेकदा विनंती केली मात्र कोणीच माझी विनंती ऐकली नाही.
बरवानीचे एसपी दीपक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, तक्रारदाराच्या वक्तव्याच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जर आरोपीच्या आईने पुरावे सादर केले तर एफआयआर निकाली काढला जाईल. पुढे ते म्हणाले की एफआयआर ही अंतिम प्रक्रिया नाही. याप्रकरणी नियमानुसार सखोल चौकशी केल्यानंतरच कारवाई केली जाईल. असे त्यांनी सांगितले.



























































