शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल उडणाऱ्या सत्तारांची कृषीमंत्री पदावरून हकालपट्टी करा, विरोधक आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल उडणाऱ्या अब्दुल सत्तार यांची कृषीमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आस्मानी संकटाच्या बेड्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सत्तार यांनी बेजबाबदार विधान केले होते. शेतकरी आत्महत्या हा काही नवीन विषय नाही, असे विधान सत्तार यांनी केले होते.

शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विषाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर करून एकप्रकारे सत्तार यांची पाठराखण केली आहे असून शेतकऱ्यांच्या अपमानाचे समर्थन केले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करत असेल तर आजच सत्तार यांची कृषीमंत्रीपदावरून हकालपट्टी करावी किंवा विधीमंडळातील सभागृहात त्यांना माफी मागण्यास भाग पाडावे. सत्तार यांचे विधान देशातील तमाम शेतकऱ्यांचे अपमान करणारे आहे, त्यामुळे सत्तार यांची कृषीमंत्रीपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली.

पंचामृत नाही, तर विषाचा घोट

दरम्यान, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. याबाबत विचारले असता मिटकरी म्हणाले की, शेतकरी सुजान आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे पाप या सरकारने केले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा मुंबईत धडकलाच नसता. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष, नैराश्य आहे. बळीराजाला सुखावणारा कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन थातूरमातूर अर्थसंकल्प सादर केला. नाव जरी पंचामृत दिले असेल तरी तो प्रत्यक्षात विषाचा घोट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुकारलेला हा एल्गार असून भविष्यात हे वादळ सरकारलाही हवेत कधी उडवून जाईल हे त्यांनाही कळणार नाही, असा टोला मिटकरी यांनी लगावला.

शेतकरी आत्महत्या हा काही नवीन विषय नाही, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी उडवली टिंगल

महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणुकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय…500 कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा नववा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदेसरकारच्या विरोधात आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)