भाजपच्या भूलथापांना येथील जनता आता वैतागली असून आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचाच उमेदवार निवडून आणू, असा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. येथील सर्वसामान्यांचे प्रश्न लोकसभेत आक्रमकपणे मांडण्यासाठी आमचा हक्काचा खासदार हवा असून तो विजयी करण्यासाठी आतापासून सर्वांनी कंबर कसावी, असे आवाहनही केले आले.
डोंबिवली पूर्वेतील गिरिजा हॉलमध्ये इंडिया आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्याचे फोडाफोडीचे राजकारण कुणालाच पसंत नसून कल्याण लोकसभा मतदारसंघातील जनता मिंधेगिरीला कदापीही थारा देणार नाही, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख विवेक खामकर, तात्या माने, संजय मांजरेकर, धनंजय चाळके, माजी नगसेवक नंदू मालवणकर, कम्युनिस्ट पक्षाचे काळू कमास्कर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजू शिंदे, काँग्रेसच्या वर्षा शिर्के, फेरीवाला युनियनचे बबन कांबळे आदी आम आदमी पार्टी, अनिस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ व निर्भय बनो या कार्यक्रमातील प्रमुख कार्यकर्ते असीम सरोदे यांचे उद्या सोमवारी शिवजयंतीनिमित्त डोंबिवलीतील बालभवनमध्ये व्याख्यान होणार आहे.