महाडमध्ये दरड कोसळली, 70 हून अधिकजण अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाड तालुक्यातील तळई गावात रात्री उशीरा दरड कोसळली असून यात 70हून अधिकारी नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तुळई गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील दरड कोसळल्याने अद्याप गावात मदत पोहचू शकलेली नाही. मात्र हेलिकॉप्टरद्वारे गावातील इतर घरांना मदत पोहचविली जात आहे.  महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14किमी अतंरावर ही घटना घडली आहे.

माणगाव, महाड परिसाला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. महाड, पोलादपूर भागातही मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. रस्त्यांवर तब्बल पाच सहा फूट पाणी होते. महाडमधील टेंभूर्णी गावातील रस्त्यांवर नऊ फुटांपर्यंत पाणी भरले आहे. पाण्यामुळे एनडीआरएफची टीम गुरुवारी रात्री माणगावमध्ये अडकली होती.

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे, मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टर मधील बचाव पथकाला ते दिसतील असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.