महादेव जानकरांची भर सभेत फजिती

28

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

मंत्री महादेव जानकर हे राज्य शासनाच्या पारदर्शक कारभाराचे गोडवे गात असतानाच भर व्यासपीठावरच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा खोटारडेपणा उघड करीत “दूध का दूध, पाणी का पाणी” केल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. दूध दरवाढीचे पितळ उघड करीत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यसाय विकास मंत्री महादेव जानकर यांची भर सभेत चांगलीच फजिती केल्याने खजील व्हायची पाळी त्यांच्यावर आली.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ व राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्पांतर्गत आयोजित केलेल्या पशुपालक मेळाव्यात ही घटना घडली. या मेळाव्याला दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या पारदर्शक कारभाराचे आणि धाडसी निर्णयाचे किस्से सांगत असताना जानकरांनी दूध उत्पादन शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर दिल्याचे स्पष्ट केले. आता असलेला २७ रुपयांचा दर ६५ रुपये करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सूतोवाच जानकरांनी करताच एकच गोंधळ झाला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशा लाखोली वहात जानकरांच्या व्यासपीठाच्या दिशेने धाव घेतली. “खोटी आश्वासने देऊ नका. कोणतीही संस्था दुधाला २७ रुपये दर देत नाही. आजही २२ रुपयांच्यावर कोणीही दमडी देत नाही. २७ रुपये दर केला म्हणून स्वतःची पाठ थापटू नका आणि दर न देणाऱ्याची पण थापटू नका…शासनाने फक्त २७ रुपये दर जाहीर केला पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही? दर वाढ न देणाऱ्या दूध संघावर कारवाई का करत नाही? आदी प्रश्नांचा शेतकऱ्यांनी भडीमार केला.

दूध दराच्या बिलाचा कागद फडकवित शेतकऱ्यांनी मंत्रीमहोदयांच्या दर वाढीच्या निर्णयाची चिरफाड केली. “खोटबोल पण रेटून बोल” या म्हणी प्रमाणे मंत्री महोदयांनी जाहीर भाषणात शासनाने दुधाला २७ रुपये लिटरला हमीभाव देत असल्याचे स्पष्ट केले. मंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर व्यासपीठावर बसलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक हे दुधाला २७ रुपये दर देतात असे ठासून सांगत त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. जानकरांचा हा खोटारडेपणा सहन न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जानकर यांना घेराव घालताच ते “त त प प” करू लागले.
जिल्हा दूध संघाच्या दूध बिलाचे पुरावे घेऊनच दूध उत्पादक शेतकरी संतप्त होऊन प्रश्नाचा भडीमार करू लागल्याने जानकरांनी “माहिती घेतो, पाहतो, बघतो “अशी बुळबुळीत उत्तर देत पोलीस बंदोबस्तात काढता पाय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या