महाकाली देवी दर्शनासाठी उसळली भाविकांची गर्दी, चैत्र नवरात्रोत्सवाचा दहावा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची चैत्र नवरात्रोत्सव यात्रा सुरू झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी भाविकांनी माता महाकाली देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच झरपट नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी एकच गर्दी करत आहेत. मराठवाड्यासह तेलंगणा, मध्य प्रदेशातीलही भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत आहेत.

यात्रेची सुरुवात गोंडराजाची महाराणी हिराई यांनी 1714 रोजी केली. आजही यात्रेची ख्याती दूरदूरपर्यंत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने भाविक येथे येतात. चैत्र नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात. यात्रेला देवीभक्तांची प्रचंड गर्दी उसळत आहे. नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेलाय. या यात्रेसाठी विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगणातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे.

महाकाली देवीच्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणचे पोतराजे येथे दाखल झाले आहेत. ते विविध कला करून भाविकांचे लक्ष वेधत आहेत. यासाठी भर उन्हात भाविक अनवाणी रस्त्याने देवीच्या दर्शनासाठी जाताना दिसून आले. दरम्यान, काही भाविकांनी लोटांगण घालून देवीची आराधना करीत आहेत. चंद्रपुरात वाढती उन्ह बघता त्यादृष्टीने मंडप आच्छादन, पेयजल, आरोग्य, निवास आदींसह मंदिर व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा केल्या आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विविध सोयीसुविधा पुरविण्यात आले आहे, पोलिसांसह खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.