
महानिर्मितीच्या वीज केंद्रांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना खूशखबर आहे. 2016 पासून मंजूर असलेला कारखाना भत्ता लागू करण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे. राज्यभरातील वीज केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या जवळपास 15 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा कारखाना भत्ता शंभर टक्के दराने लागू होणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात 700 रुपयांपासून 1600 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.
वीज केंद्रांमध्ये काम करणे जोखमीचे आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने प्रत्यक्ष वीज केंद्रांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारखाना भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2021 पासून हा भत्ता लागू होणार आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांना महिन्याला 1600 आणि 1300 रुपये तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना महिन्याला एक हजार आणि 700 रुपये असा भत्ता लागू होणार आहे.
आठ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच भत्ता लागू
वीज केंद्रांमध्ये जे कर्मचारी आठ तास काम करतात तसेच शनिवार आणि सार्वजनिक सुट्टय़ांचा लाभ घेत नाहीत त्यांनाच हा भत्ता मिळणार आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱयांना घरभाडे मिळते त्यांना कारखाना भत्ता लागू होणार नसल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.



























































