राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ महारॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जय भवानी, जय शिवाजी,कोण आला.. रे, कोण आला,महायुतीचा वाघ आला. शहर का नेता कैसा हो, राज्यमंत्री अर्जुन खोतकर जैसा हो,पुन्हा येणार,महायुतीचेच सरकार, अशा गगनभेदी घोषणा, हातात भगवे ध्वज,गळ्यात भगवा रुमाल. असलेले महायुतीचे सर्व शिलेदार लोकशाहीच्या महाउत्सवासाठी सज्ज झाले आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना शहरात जोरदार झंझावाती प्रचार महारॅलींना सुरुवात झाली आहे. या महा रॅलीस जालनाकरांनी उदंड प्रतिसाद देत महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचे जंगी स्वागत केले.

जालना विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षातर्फे निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ सकाळी जुना जालना भागात विराट महा रॅली काढण्यात आली. तर सायंकाळी मुर्गी तलाव चौक येथून खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महारॅलीस सुरुवात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, शिवसेनेचे संजय खोतकर,रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, सिद्धिविनायक मुळे, आत्मानंद भक्त, घनश्याम खाकीवाले, दादाराव पाचफुले,राम सतकर, गणेश सुपारकर,राजेश घोडे,मुन्ना ठाकूर,भरत कुसुंदल,योगेश रत्नपारखे, सुशिल भावसार,दिनेश भगत,नरेश खुदभैय्ये, गणेश लाहोटी आदींची उपस्थिती होती.

मिलन चौक येथून सुरुवात झालेली रॅली युसूफ कॉलनी, शेरसवार नगर, हाकीम मोहल्ला, कुरेशी मोहल्ला मार्गे जात विसर्जित करण्यात आली.यावेळी रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या या मान्यवर नेत्यांनी मतदारांशी संवाद साधून खोतकर यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. दरम्यान सायंकाळी मुर्गी तलाव चौकी येथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पहिल्याच दिवशी निघालेल्या महारॅलीस जालनेकरांनी उदंड प्रतिसाद दिल्याने महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून सर्वत्र चैतन्य पसरले आहे.