
शिवसेनेतून जे जे फुटले ते नंतर निवडून आले नाहीत. शिवसेनेतून सध्या फुटलेले 40 आमदार पैशांचा पाऊस पाडत आहेत. असे आमदार फुटून सरकार कोसळायला लागले, तर सत्ता स्थापन करणे अवघड होईल. महाराष्ट्रातील हे दुर्दैवी चित्र असून, आगामी निवडणुकीत या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. दरम्यान, कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. 145चा आकडा गेला, की एकनाथ शिंदेही सत्तेतून जातील. ते कायमचे खुर्चीवर बसणार नाहीत, असा सूचक इशारा देताना भाजपवरही त्यांनी सडकून टीका केली.
पन्हाळ्यातील आसुर्ले-पोर्ले ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, सरकार येऊन 100 दिवस झाले, पण हे शिंदे सरकार महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना व निधीला स्थगिती देण्याचे काम करत आहे. आमचे सरकार असताना आम्ही भेदभाव केला नाही. सर्वांना निधी दिला; पण हे भाजप-शिंदे सरकार केवळ त्यांच्याच आमदारांना निधी देत आहे. हे काही मूठभर लोकांचे राज्य नाही. एकनाथ शिंदे यांच्या मनात काय होते, की ते या 40 आमदारांना घेऊन गेले, असा सवाल करत सर्वत्र त्यांना ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ म्हणून बोलले जात असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.
2019च्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचे विचार वेगळे असतानाही काही मुद्दे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो. कोरोनाच्या संकटातही एकत्र काम केले. प्रचंड बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला. विकासात्मक दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते केले, पण सगळेच मला पाहिजे या भाजपच्या प्रवृत्तीतून राज्यातील हे महाविकास आघाडी सरकार कोसळले. यापुढेही जनतेने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणारच. कोणीही असो सत्ता येते-जाते. आपण सत्तेसाठी हापापलेलो नसल्याचेही ते म्हणाले.
मेळाव्यासाठी एसटीला भरलेली दहा कोटींची रक्कम कोठून आणली, असा सवाल अजित पवार यांनी केला. हा महाराष्ट्र असून, असला प्रकार येथे चालणार नाही. हातात असलेले धड चालवता येत नसताना दुसरीकडे बिगर भाजपचे सरकार पाडण्यात भाजप पुढे असून, आता आपल्या हातात आलेले आमदार जातील म्हणून सध्या मंत्रिमंडळ विस्तार करत नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्याच भाषणाला अधिक प्रतिसाद
मुंबईत झालेल्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी लोक अक्षरशः निघून जात होते. बहुतांश लोकांना आपण येथे का आलो हेच माहीत नव्हते. याची पोलखोल अनेक माध्यमांतून झाली. या मेळाव्यात महागाई, बेरोजगारी यावर बोलणे अपेक्षित असताना, ते काहीही बोलत सुटले होते. तुमच्यापेक्षा शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच भाषणाला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे अजित पवार यांनी आवर्जून सांगितले.



























































