राज्यात तीन वर्षांत 14 हजार 536 बालमृत्यू

राज्यात मागील तीन वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 14 हजार 526 बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

ग्रामीण, शहरी तसेच आदिवासी भागातील बालमृत्यूबाबत भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात आबिटकर यांनी बालमृत्यूविषयी माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांतील 14 हजारांहून अधिक बालमृत्यू हे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिह्यात झाल्याचे उत्तरात नमूद केले आहे.

ऑक्टोबर 2025 च्या आकडेवारीनुसार सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 303 असल्याचे उत्तरात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याचा 2023 सालचा नवजात मृत्यू दर हा प्रति एक हजार जन्मामागे 11 इतका असल्याची माहिती आबिटकर यांनी उत्तरात दिली आहे.