
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ऍड. अनिल परब यांनी या वेळापत्रकावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सगळय़ा आमदारांचा गुन्हा सारखा आहे, त्यामुळे वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही आणि सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का असा सवाल करतानाच, वेळकाढूपणा न करता विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण महिनाभरात संपवावे अशी अपेक्षा आहे, असे आमदार परब म्हणाले.
एकत्रित सुनावणी घेतल्यास एवढा वेळ का?
– विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना हे वेळापत्रक ई-मेलद्वारे पाठवले आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या वेळापत्रकावर आक्षेप घेतला. हे वेळापत्रक म्हणजे एक धूळफेक आहे. साक्ष आणि तपासणी हे फक्त वेळ काढण्यासाठी आहेत, असे ते म्हणाले. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उलटतपासणी किती काळ चालणार?
– सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही तारखांवर तारखा ठरवण्यात येत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिलंय. पुरावे पाहण्याची गरज नाही. वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही. नोव्हेंबर 23 तारखेपर्यंतच्या तारखा कळवल्या आहेत. त्यानंतर उलटतपासणी सुरू होणार आहे, परंतु उलटतपासणी किती वेळ चालणार याबाबत वेळापत्रकात काहीच माहिती नाही, असे आमदार परब म्हणाले.
निःपक्षपातीपणे निर्णय घ्या!
– अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पक्षपात न करता न्याय देण्याची विनंती केली आहे. विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे विधासभा अध्यक्षांसमोर सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार, प्रतोद यांच्या चुका सारख्याच आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा, असे अनिल परब म्हणाले.
प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टात जावे लागणार का? आम्हाला न्याय देणार की नाही?
– विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱहे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया या तिघांच्या अपात्रतेबाबतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गेल्या जुलैमध्ये विधिमंडळ सचिवांकडे अर्ज दिला होता. त्यावर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. कुणालाही नोटिसा देण्यात आल्या नाहीत. विधिमंडळ सचिवांना स्मरणपत्रही देण्यात आले. त्यावरही काहीच उत्तर नाही. प्रत्येक वेळेला आम्हाला उठून सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे का? हे आम्हाला न्याय देणार आहेत की नाहीत? असा सवालही यावेळी आमदार अनिल परब यांनी केला.
























































