दहीहंडी समन्वय समितीच्या प्रयत्नांना सरकारदरबारी यश, राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 50 हजार गोविंदांना सरकारतर्फे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगदरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना हे विमा संरक्षण मिळेल. यासंदर्भात दहीहंडी समन्वय समितीने सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता.

दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱया गोविंदांचा विमा उतरवण्याबाबत दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांनी सरकारसोबत नुकत्याच दोन बैठका केल्या. त्यात सरकारतर्फे गोविंदांना विमा संरक्षण पुरवण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रतिगोविंदा 75 रुपयांचा विमा हप्ता याप्रमाणे एकूण 37 लाख 50 हजार इतका निधी संबंधित विमा कंपनीला अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समितीकडे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे लवकरात लवकर संपर्क साधून विमा काढून घ्यावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर आणि सचिव गीता झगडे यांनी केले आहे.