विधानसभा२०१९ – पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघात घेणार पहिली सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची खरी रणधुमाळी विजयादशमीपासून सुरू होणार आहे. 7 तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर प्रचाराला वेग येईल. प्रचारासाठी भाजपची धुरा यंदा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर असणार आहे. पंतप्रधान मोदी हे शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरणार आहेत.

राज्यात पंतप्रधान मोदींच्या 9, शहांच्या 18 सभा होणार! – चंद्रकांत पाटील

राज्यामध्ये मोदींच्या 9 आणि शहांच्या 18 अशा एकूण 27 सभा होणार आहेत. साताऱ्यात होत असलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासाठी ते पहिली सभा घेणार आहेत. त्यानंतर राज्यात ते सलग तीन दिवस सभा घेण्याची शक्यता आहे. मोदी यांच्यासह शहा यांच्याही सभांचा धडाका सुरू होईल. अद्याप त्यांच्या सभांच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणुकही होतेय. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली सभा उदयनराजे यांच्यासाठी घेत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.