महाराष्ट्रावर ढगफुटीची आपत्ती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास औंधकर

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईसह राज्याच्या विविध जिह्यांत पावसाने मुक्काम ठोकला असून 21 जुलै रोजी पावसाने कोकणात रौद्ररूप दाखविले. चिपळूण व आसपासच्या गावांत भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यापाठोपाठ चाळीसगाव व कन्नड घाट परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे खूप मोठी हानी झाली. लगेच 6 व 7 सप्टेंबर या दोन दिवसांत मराठवाडय़ातील नांदेड व संभाजीनगर परिसरातील गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या वर्षी महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ-मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व प्रदेशांना ढगफुटीचा फटका बसला. सहसा किनारपट्टी भागात ढगफुटी होत नसते. प्रामुख्याने उंच डोंगराळ प्रदेशातच ढगफुटीची शक्यता अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा ढगफुटी होण्यामागचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे.

एखाद्या ठिकाणी दुपारनंतर सूर्य पश्चिम आकाशात सरकल्यानंतर वातावरणातील गरम हवा व वाढलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते व गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे काळेकुट्ट ढगच निर्माण होतात या ढगांना ‘क्यम्युलोनिम्बस’ असे नाव आहे. हा लॅटीन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात अतिशय कमी वेळात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही याची सुरुवात असते.

विशिष्ट वेळी पाण्याचे अब्जावधी थेंब हे या ढगांमध्ये विखुरले जातात व जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते. पण कधी कधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा जलस्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्ट असेही म्हणतात. पाण्याच्या थेंबांना घेऊन तो वरवर चढत निघतो. या जलस्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधी कधी या थेंबाचा आकार 3.5 मि.मी.हून मोठा होतो. काही वेळा या वर चढणाऱया हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण झाल्याने ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब अडकतात व वादळात वेगाने गिरक्या घेत एकमेकांवर आदळतात आणि एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा हा जलस्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबांना घेऊन वरवर चढू लागतो. या वेळेस त्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजनही खूप वाढलेले असते.

हवेच्या जलस्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग एखादा चक्रीय पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच काही या जलस्तंभाचे होते. या जलस्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. या वेळी जलस्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा जलस्तंभ आता जमिनीच्या दिशेने येण्यास सुरुवात करतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. खाली येणाऱया या थेंबाचा वेग सुरुवातीला साधारणपणे ताशी 12 कि.मी. असतो व तो पहाता पहाता ताशी 80 ते 90 कि.मी.पर्यंत पोहोचतो.

सर्वसाधारणपणे प्रतितास 100 मिलीमीटर (3.9 इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला तर ढगफुटी झाली असे मानले जाते. ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा हा जलस्तंभ धो-धो कोसळतो. पाण्याचे मोठमोठे थेंब व प्रचंड वेग यामुळे जमिनीवरील त्याखाली येणारे सर्व काही अक्षरशः झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्याकरिता पाण्याचा हा मारा फारच धोकादायक ठरतो. प्रत्येक ठिकाणची जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते व त्याप्रमाणे पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. काही मिनिटांतच प्रचंड पाणी साचल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबवते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी जर एखाद्या डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात, त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात खडक, माती व झाडे पायथ्याकडे ढकलली गेल्याने घाटात दरडी कोसळतात. वरती चढणारा जलस्तंभ व खाली येणारा जलस्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा जलस्तंभ जेंव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेंव्हा त्यातील

ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱयाची वावटळ उठते. यामुळे वाहणाऱया वाऱयाचा वेग कधी कधी ताशी दीडशे ते दोनशे कि.मी. इतका प्रचंड पाहिला गेला आहे. यामुळेच याच्या तडाख्यात लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात.

ढगफुटी ही हिमालयीन प्रवेशासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते.

मुंबईत 26 जुलै 2005 रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. मात्र अशी परिस्थिती फारच कमी वेळा निर्माण होते. मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आठ तासांत 950 मि.मी. पाऊस पडला होता.

सर्वात मोठी ढगफुटी

हिंदुस्थानातील लेहमध्ये 6 ऑगस्ट 2010 रोजी झालेली ढगफुटी ही जगातील आजघडीच्या सर्व ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पडलेला नाही. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक किलोमीटर पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यात अब्जावधी लिटर पाणी भरलेले असते व हा आकाशातील पाण्याचा ढग अक्षरशः फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.

यंदा डिसेंबरपर्यंत पाऊस राहणार

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील तापमानाचा वर्षभर सतत अभ्यास केला जातो. या ठिकाणी असलेल्या तापमानातील बदलात झालेल्या फरकाचा फटका अथवा फायदा जागतिक पातळीवर होतो असा निष्कर्ष काढला जातो.
हिंदुस्थानच्या संदर्भात बोलायचे झाल्यास प्रशांत महासागरातील विषुववृत्ताच्या 3.4 या ठिकाणी असलेल्या तापमानातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. जर या ठिकाणचे सरासरी तापमानापेक्षा 0.5 अंश तापमान वाढले की, ही परिस्थिती अलनिनो आहे संबोधले जाते व जर सरासरी तापमानापेक्षा उणे 0.5पेक्षा कमी असेल तर ती परिस्थिती ला निना आहे असे संबोधले जाते. जर अलनिनोची परिस्थिती असेल तर आपल्या हिंदुस्थानातील मान्सूनमुळे मिळणाऱया पावसात घट दिसून येते तर ला निना परिस्थितीत जास्त पाऊस मिळतो.
सध्यस्थितीत सरासरी तापमानात घटच अपेक्षित असून येत्या डिसेंबरपर्यंत ही स्थिती ला निनाकडे सरकण्याची शक्यता अधिक असल्याने यंदाही पावसाळा हा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. या वेळेस हिंदुस्थानी सामुद्रिक स्थिरांक (IOD) हा निगेटिव्ह होत असल्याने अरबी समुद्राकडून येणाऱया पावसाचे प्रमाण कमी असेल असेही दिसत आहे. या बदलामुळे येत्या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन दोन ते तीन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यताही दिसून येत आहे.

या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे सुमारे 100पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. गाय, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा आदी हजारो लहानमोठी जनावरे तसेच लाखो कोंबडय़ा आदी पाण्यात वाहून गेल्या. इमारती-घरांची पडझड, वाहने वाहून गेल्याने नुकसान तर झालेच तसेच महामार्ग, रस्ते, पूल वाहून गेल्याने राष्ट्रीय संपत्तीचेही मोठे नुकसान झाले. महाराष्ट्रातील लाखो एकर शेतीचे क्षेत्र अवघ्या काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले.

यंदा राज्यात जवळपास सवाशे ते दीडशे ढगफुटीसदृश्य घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून यात वाढच दिसून आली आहे.

ढगफुटीमुळे अचानक आलेल्या महापुरात नागरिकांचे किंवा वस्तीचे स्थलांतर अशक्यप्राय असते. मराठवाडय़ातील अनेक जिह्यांतील नागरिकांना महापुराबाबत माहिती मिळण्यासाठी तसेच ढगफुटीची आगाऊ सूचना देऊन वित्त-जीवितहानी व शेतीचे नुकसान टाळण्यासाठी संभाजीनगर येथे कायमस्वरूपी डॉप्लर रडार तातडीने बसविणे आवश्यक आहे.

ढगफुटीच्या इतर प्रमुख घटना
लेह (6 ऑगस्ट 2010). फक्त एका मिनिटात 48.26 मि.मी. पाऊस
बरोट, हिमाचल प्रदेश, (26 नोव्हेंबर 1970). एका मिनिटात 38.10 मि.मी. पाऊस
पोर्ट बेल, पनामा (29 नोव्हेंबर 1911). पाच मिनिटांत 61.72 मि.मी. पाऊस
प्लंब पॉइंट, जमेका (12 मे 1916). पंधरा मिनिटात 198.12 मि.मी. पाऊस
कर्टिआ, रुमानिया (7 जुलै 1947). वीस मिनिटांत 205.74 मि.मी. पाऊस
व्हर्जिनिया, अमेरिका (24 ऑगस्ट 1906). चाळीस मिनिटांत 234 मि.मी. पाऊस

[email protected]