आघाडी सरकारच्या काळात 70 हजार कोटी खर्चूनही सिंचन वाढले नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

आघाडी सरकारच्या काळातच सिंचनासाठी तब्बल 70 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु सिंचनात काही वाढ झाली नाही. एकाही गावात सिंचनासाठी थेंबभरसुद्धा पाणी मिळाले नाही अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. तसेच मोदी आणि फडणवीस सरकारच्या काळात केवळ 9 हजार कोटी खर्चून 17 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱयाच्या शेतापर्यंत पाणी पोहचवण्यात आले, असेही शहा म्हणाले.

कारंजा येथे आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते. गेल्या 70 वर्षांत एकाही पंतप्रधानाला कलम 370 हटवता आले नाही, परंतु मोदींनी आपल्या दुसऱयाच टर्ममध्ये हे करून दाखवले. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याने या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही शहा यावेळी म्हणाले. दरम्यान, 2024 पूर्वी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील घुसखोरांना बाहेर काढू, असेही ते म्हणाले.

समृद्धी महामार्गाला 55 हजार कोटी दिले

आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र थेट 15 हूनही खालच्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यांच्या काळात दर तीन वर्षांनी मुख्यमंत्री बदलायचे, पण मोदी यांनी पाच वर्षे फडणवीस सरकारला संधी दिली. फडणवीस सरकारने समृद्धी महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपयांचा निधी दिला तर आघाडी सरकारच्या काळात केवळ 16 लाख शेतकऱयांना फक्त 8 कोटींची कर्जमाफी दिली याकडेही शहा यांनी लक्ष वेधले.