
विधानसभा निवडणुकीला जेमतेम चार ते पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीही विरोधकांच्या प्रचारात कुठल्याही प्रकारचा जोर दिसत नसल्याचे चित्र आहे. विरोधकांचा उत्साह लढण्याआधीच मावळला असून काँग्रेस उमेदवारांच्या सभांमधून दिग्गज नेतेच गायब आहेत. ज्या काही सभा होत आहेत त्या सभांमध्ये महायुतीविरोधात दंड थोपटून आघाडीलाच निर्भेळ यश मिळेल असे आत्मविश्वासाने सांगताना एकही नेता दिसत नाही. तसेच त्यांच्याकडे प्रचारासाठी कुठलाही ठोस मुद्दा नसल्याचे उघड झाले आहे.
यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारांमध्ये दिग्गज नेत्यांचा अभाव दिसत आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईच्या धारावीत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु या सभेत काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांच्यासह कुठल्याही दिग्गज नेत्याची उपस्थिती नव्हती. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. असे असतानाही त्यांची सभांमध्ये उपस्थिती नव्हती.
दिग्गज नेत्यांना आपापल्या जागांची काळजी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपापल्या जागा वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. या निवडणुकीत महायुतीच्या प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा पार धुरळा उडाला आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अशोक चव्हाण हेदेखील आपली भोकरमधील जागा वाचवण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या मतदारसंघात प्रचार करण्यातच ते गुंतलेले आहेत.
‘निकम्मा’ सभेच्या वेळी कुठे होता?
राहुल गांधी यांच्या सभेला मिलिंद देवरा उपस्थित नव्हते. यावरून काँग्रेसचे अस्वस्थ नेते संजय निरुपम यांनी देवरा यांचे नाव न घेता त्यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला. काँग्रेसचा तो निकम्मा नेता या सभेच्या वेळी कुठे होता, असा सवाल त्यांनी केला. यावरून पुन्हा मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यातील धुसफूस चव्हाटय़ावर आली. सध्या संजय निरुपम काँग्रेसच्या कुठल्याही उमेदवाराच्या प्रचारसभेत सहभागी होत नसल्याचे चित्र आहे.
- काँग्रेसकडे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही पुरेसा निधी नसल्याचे उघड झाले आहे. या पथकांना गाडीभाडे देण्यासाठीही पैसा नसल्याचे समोर आले आहे.































































