
महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार असून या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी विधान भवन सज्ज झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या 36 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सोमवारी दुपारी 1 वाजता विधिमंडळ प्रांगणात पार पडणार आहे. शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार खातेवाटपही जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाली नव्हती. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये फक्त नावांचीच चर्चा होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तीनही पक्षांतील सात मंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. या शपथविधीनंतर महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातच मंत्रिमंडळ विस्ताराचे सूतोवाच करण्यात आले होते. त्यानुसार तीनही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मंत्रिमंडळात नेमके कोण असणार याची यादी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी सायंकाळी झालेल्या बैठकीत अंतिम यादी तयार करण्यात आली. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट दिल्ली गाठून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यादी अंतिम केली. त्यानंतर या याद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या असून सोमवारी शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार खातेवाटप जाहीर केले जाणार आहे.
गृहखाते कुणाकडे हे विस्तारानंतरच कळेल!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘सध्या सहा मंत्र्याकडे दिलेली खाती ही तात्पुरत्या स्करूपातील आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप करण्यात येईल. हा सर्वस्की निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. गृहखाते कुणाकडे असेल हे विस्तारानंतर कळेल’, अशी माहिती पाटील यांनी दिली.
- सोमवारी होणाऱया 36 मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 तर काँग्रेसचे 10 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे 10 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री तर काँग्रेसचे 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री असणार आहेत.
यांची वर्णी लागण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस
- अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जीतेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आदिती तटकरे, डॉ. किरण लहामटे
काँग्रेस
- के. सी. पडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, अमीन पटेल





























































