राज्यातील 56 हजार कलावंतांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे आर्थिक कुचंबणा सहन कराव्या लागणाऱया सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक सहाय्य करण्याचा मोठा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या 56 हजार एकल कलावंतांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

राज्यातील 56 हजार कलाकारांना आर्थिक मदत म्हणून 28 कोटी रुपये तर प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील 847 संस्थांना सहा कोटी रुपये असे एकूण रुपये 34 कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मदतीसाठी पात्र कलावंतांची निवड वृत्तपत्र आणि इतर माध्यमातून जाहिरातीद्वारे अर्ज मागवून करण्यात येईल. एकल कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समिती कलावंतांची निवड करील. संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावरील समितीद्वारे करण्यात येईल. पात्र कलावंतांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येईल.

मादक पदार्थ सेवन प्रतिबंध योजना

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून ती 2023 पर्यंत राज्यात राबविण्यास मान्यता दिली. मादक पदार्थांचा गैरवापर वाढल्याने सरकारने निर्णय घेतला असून 13 कोटी 70 लाख रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली.

सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा

सहकारी संस्थांच्या सदस्यांसाठी अधिनियमात सुधारणा करण्यात आली. कोविडमुळे निवडणुका पुढे ढकलल्याने नियमित सदस्यांना संरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 73 अमधील पोट कलम (3) मध्ये सुधारणा करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला.

अध्यापकांना सेवानिवृत्तीचा लाभ

राज्यातील अकृषी विद्यापीठे अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट, सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. जे अध्यापक 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त होते त्यांना याचा लाभ मिळेल.