
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिवंगत कविवर्य पद्भूषण मंगेश पाडगावकर यांच्या ‘बोलगाणी’पेक्षा राज्य सरकारचीच ‘बोलबच्चन गाणी’ सुपरहिट असल्याचे उघड झाले आहे. कारण पाडगावकरांचे स्मारक उभारण्याची घोषणा करूनही सरकारने गेल्या आठ महिन्यांत फक्त कागदी घोडेच नाचवले आहेत. रविवारी पाडगावकरांचा स्मृतिदिन. किमान त्या दिवशी तरी मुख्यमंत्री ठोस आदेश देऊन पाडगावकरांना यथोचित आदरांजली वाहतील अशी पाडगावकरप्रेमींची अपेक्षा आहे.
मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले येथील सागरेश्वर किनाऱ्यावर शब्दशिल्परूपी स्मारक व्हावे यासाठी सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राने सातत्याने प्रयत्न केले. आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांशी पत्रव्यवहार केला. अखेर या प्रयत्नांना यश आले. राज्य सरकारने 9 मार्च 2018 रोजी विधिमंडळात घोषणा केली. महाकवी ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ले येथे स्मारक उभारण्यात येईल असे जाहीर करतानाच अर्थसंकल्पात स्मारक खर्चाची तरतूदही करण्यात आली.
लाल फितीतील कारभार
सरकारी लाल फितीतील कारभाराचा फटका पाडगावकरांना बसलाच. गेल्या आठ महिन्यांत स्मारकाबाबत मंत्रालय पातळीवर काहीच हालचाल झालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. पर्यटन व सांस्कृतिक विभागाने सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. एमटीडीसीच्या एका अभियंत्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे स्मारक उभारणीएवढा निधी आहे, पण सरकारी आदेशच नसल्याने खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘वर्षा’समोर उपोषण
या सरकारी जाचाला कंटाळून अखेर सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अतुल हुले यांनी अखेर ‘वर्षा’ निवासस्थानासमोरच उपोषण करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. त्यानंतर आज दुपारी मुंबई पोलिसांनी हुले यांना उपोषण न करण्याची विनंती केली. हुले यांनीही ती मान्य केली, पण निर्णयावर ठाम असून नंतर उपोषण करणारच असे हुले म्हणाले.
मुख्यमंत्री पाडगावकरांना आदरांजली वाहणार का?
मंगेश पाडगावकरांचा आज तृतीय स्मृतिदिन वेंगुर्ल्यासह राज्यभरात ठिकठिकाणी काव्यगायनाने साजरा होईल. मुख्यमंत्र्यांनीही आता सरकारची बोलबच्चन गाणी थांबवून पाडगावकरांच्या स्मारकाचे ठोस आदेश द्यावेत आणि आदरांजली अर्पण करावी अशी मागणी सिंधुदुर्ग सांस्कृतिक केंद्राने केली आहे.


























































