मिंधे सरकारने बेरोजगारांकडून उकळले 266 कोटी, 35 हजार जागांच्या भरतीसाठी 27 लाख अर्ज

 ‘अमृत महोत्सव’ निमित्ताने राज्य सरकारने 75 हजारांची मेगाभरती प्रक्रिया सुरू केली आहे. यात तलाठी (महसूल), जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील भरतीचा समावेश आहे. प्रत्येक भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला अर्जासाठी एक हजार रुपयांचे तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपयांचे शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे या तीन विभागांच्या भरतीमधून सरकारच्या तिजोरीमध्ये अंदाजे 266 कोटी रुपयांचे शुल्क जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

तलाठी पदाच्या 4 हजार 657 जागा रिक्त असून यासाठी एकूण 10 लाख 41 हजार अर्ज आले आहेत. जिल्हा परिषदेत 19 हजार 460 जागा रिक्त असून यासाठी 14 लाख 51 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आरोग्य विभागात 10 हजार 949 जागा रिक्त असून यासाठी 2 लाख 13 हजार प्राप्त झाले आहेत. एकूण जागा 35 हजार 66 असून यातून जवळपास 265.54 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत. दरम्यान, साडेचार महिन्यांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरती प्रक्रिया राबवली होती. 18 हजार 831 जागांसाठी 18 लाख अर्ज आले होते. यातूनही राज्य सरकारच्या तिजोरीत कोटय़वधी रुपयांचे शुल्क जमा झाले होते.

बेरोजगारीचा उच्चांक

राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. 35 हजार जागांसाठी तब्बल 27 लाख अर्ज करण्यात आले आहेत. बेरोजगार तरुणांना एक हजारांपर्यंत शुल्क आकारून राज्य सरकारने आपली तिजोरी भरून घेतली आहे.