
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस हा स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा 6 जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज अधिकृतपणे घेतला आहे.
या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱयांनी गुढी उभारून अभिवादन करावे व महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रम आयोजित करावा. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होणे अनिवार्य आहे, असे परिपत्रक ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अवघ्या विश्वाचे प्रेरणास्थान आहेत. राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674, म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते. याच दिवशी स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्तेही झाले. तो हा शुभदिन होय. तो दिवस ‘शिवस्वराज्य दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरांतून करण्यात येत होती. राज्य सरकारने शिवप्रेमींची ही मागणी पूर्ण केली आहे.



























































