
राज्य सरकारने नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडपासून आँफीसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतला असताना आता मंत्रालयाच्या कॉरीडॉरमध्ये कोणत्याही वेळेत चहा पिताना चकाटय़ा पिटणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बंधने घातली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीमधील कॉरीडॉरमधील चहा विक्री बंद करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
मंत्रालयाची मुख्य इमारत व विस्तारित इमारतींमध्ये काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना कँटीनमार्फत चहा पुरवला जातो. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांसाठी कॉरीडॉरमध्ये चहाची विक्री होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात व्हिजिटर्स वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी येतात. अनेकदा चहा पिण्यासाठी कॉरीडॉरमध्ये गर्दी होते. कोणत्याही वेळेत चहा पिण्यासाठी झुंबड उडालेली असते. त्यामुळे कार्यालयातील शिस्त बिघडल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे कॉरीडॉरमध्ये चहाची विक्री न करता सहाव्या व तिसऱ्या सहाव्या मजल्यावरून कँटीनमधील कर्मचारी ट्रेमधून चहा पुरवतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि दुपारी तीन ते चार या वेळेतच चहा पुरवण्यात येणार आहे.
































































