
मान्सून आणखीन पाच ते सहा दिवस लांबणीवर पडला आहे. मान्सूनपूर्व पावसाचाही म्हणावा असा जोर नसल्याने उन्हाचा कडाका आणि उकाडय़ाने हैराण होऊन महाराष्ट्र अक्षरशः तापला आहे. मुंबईत उष्णतेच्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच कोकणात मात्र पुढील 24 तासांत वादळी वाऱयासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यने व्यक्त केला आहे. मान्सून गोव्याच्या सीमेवरच रेंगाळला आहे.
12 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
मान्सूनची वाट महाराष्ट्रातील शेतकरी चातकाप्रमाणे पाहत आहेत, मात्र हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आलेले सर्व अंदाज फोल ठरले आहेत. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातदेखील यंदाच्या वर्षी वेळेपूर्वी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र अद्याप मान्सून राज्यात दाखल झालेला नाही. 12 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.


























































