बेकायदेशीररीत्या स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारच रखडल्याने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही रखडले होते. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढल्यानंतर घाईघाईत पावसाळी अधिवेशनाची 10 ऑगस्ट तारीख प्रस्तावित करण्यात आली. मात्र, 9 ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि 10 ऑगस्ट रोजी लगेच अधिवेशन घेण्याचे गणित काही जुळता जुळत नसल्याने अधिवेशन 17 ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय झाला. 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक 20, 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पावसाळी अधिवेशनासाठी 18 जुलै ही तारीख जाहीर केली होती. मात्र 30 जून रोजी शपथविधी पार पडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आणि या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्तही या सरकारला सापडेनासा झाला. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णयच होत नसल्याने विरोधी पक्षांकडून वाढत्या दबावापोटी मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच 10 ऑगस्टपासून अधिवेशन घेण्याचे निश्चित केले होते. मात्र नव्याने मंत्रिमंडळात येणाऱ्या मंत्र्यांनाच त्यांच्या खात्याविषयी कल्पना नसल्याने ताबडतोब अधिवेशन घेणे अडचणीचे ठरणार असल्याने अधिवेशनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली.



























































