माझ्यावरील कारवाई कट कारस्थानाचा भाग; एकनाथ खडसे यांचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. आपल्यावर झालेली कारवाई कट कारस्थानाचा भाग होती, असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. 2019 साली जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख दावेदार म्हणून माझे नाव पुढे येत होते”, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, 2019 च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र त्याआधीच 2016 रोजी मला राजीनामा द्यावा लागला होता. माझ्यावर खोटे आरोप करुन मला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले गेले. माझ्याविरोधात ठरवून षडयंत्र रचले गेले. ज्या भूखंडाचा आरोप माझ्यावर ठेवला गेला, त्या भूखंडाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी तो जमीन व्यवहार केलेला नाही. मी ती जमीन पाहिली देखील नाही. मी फक्त त्या जमीनीबाबत बैठक घेतली होती. त्याचे प्रोसिडिंग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले होते. केवळ बैठक घेतली म्हणून माझ्या परिवाराची ईडी चौकशी करण्यात आली. त्याआधी लाचलुचपत विभागाने त्याची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीसाठी माझे जावई गेले असता त्याचदिवशी त्यांना अटक करण्यात आली. मला न्यायालयाने संरक्षण दिले असल्यामुळे माझी अटक टळली होती, असेही खडसे यांनी सांगितले.

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता, तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली. त्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले असून तुमचा हेतू शुद्ध नसल्याचे सांगितले आहे. माझ्यावर अटकेची टांगती तलवार ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. आयकर विभागाने माझी दोन वेळा चौकशी केली, त्यात काहीच आढळून आले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत दोन वेळा चौकशी झाली. त्यातही काही आढळले नाही. तरीही पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे. कसंही करुन, काहितरी शोधून मला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संबंध नसलेल्या प्रकरणातही मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यताही खडसे यांनी व्यक्त केली.

चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव होणारच आहे. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपाने त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपाला बिनविरोधची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खान्देशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणूक जागेसाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी प्रचारासाठी जाणार आहोत. मी स्वतः चार ते पाच दिवस तिथे प्रचार करणार असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.