
ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असून शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना ऑनलाइन तासिका, अभ्यासक्रम याविषयीच्या सूचना मिळतील, अशी अपेक्षा असताना मुंबईतील शिक्षण निरीक्षक कार्यालयातून शाळांनाच पाचवी ते बारावीच्या (अकरावी वगळून) ऑनलाइन वर्गांचे जून, जुलै महिन्यांसाठीचे नियोजन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहावी, बारावीचे शिक्षक सध्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्याच्या कामात गुंतले असताना त्यातच या अनावश्यक कामाला शिक्षकांना जुंपण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे. विशेष म्हणजे जून व जुलै महिन्यांचे ऑनलाइन शिक्षणाच्या वेळापत्रकाचे नियोजन शिक्षण विभागाला आजच (15 जून) हवे आहे. एकेका शिक्षकाकडे 5 ते 6 वर्ग असतात. त्यामुळे दहावीचे काम करावे की वेळापत्रक नियोजन करावे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. ऑनलाइन शिक्षण घेणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन व ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या अध्यापन तंत्राचा वापर करून शिकवावे लागते. अशा परिस्थितीत एका दिवसात दोन महिन्यांचे नियोजन कसे करणार? असा सवाल शिक्षक करीत आहेत.
लोकल प्रवासाची मुभा नसताना शाळेतील उपस्थितीच्या सक्तीने शिक्षकांमध्ये नाराजी
मुंबईत शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी नसताना शाळेत उपस्थितीची सक्ती कशासाठी? असा सवाल शिक्षक करीत आहेत. मंगळवारपासून ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली असून प्राथमिक शिक्षण संचालक द.गो.जगताप यांनी पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांना शाळेत 50 टक्के, तर दहावी आणि बारावीच्या शिक्षकांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱयांनाही उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. मात्र शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवायचे की शाळेत उपस्थित राहायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिली ते आठवीच्या शिक्षकांचा दहावीच्या मूल्यमापन कामात संबंध नसल्याने त्यांना शाळेत न बोलवता ‘वर्क फ्रॉम होम’नुसार घरातून ऑनलाइन वर्ग घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडय़ा यांनी केली आहे.


























































