बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय लढाई आता निर्णयाक टप्प्यात पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामुळे फडणवीस सरकारला बुधवारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. न्यायालयाने तीन दिवसांच्या युक्तिवादानंतर अखेर बुधवारी 5 वाजेपर्यंत फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर विविध पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला फैसला म्हणजे फडणवीस सरकारसाठी दणका मानला जात आहे. त्यामुळे भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आज आलेल्या सर्वोच्च न्यायालच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवू’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच ते निघून गेले. यावेळी भाजप नेते, आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन हे देखील तिथे उपस्थित होते.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून समाधान व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘भाजपच खेळ खल्लास’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, ‘या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष समाधानी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे’, अशी मागणी यावेळी केली.