
भाजपचे मंत्री हे शिंदे गटाच्या मंत्र्यांना गृहीतच धरत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या विभागाच्या बैठका घेतल्याने कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी थटथयाट सुरू केला आहे. संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. यापुढे माझ्या पूर्वपरवानगीने आणि माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या, अशा शब्दांत तंबी दिली आहे. माधुरी मिसाळ यांनीही पत्राला प्रत्युत्तर देत तुमच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचे बाणेदारपणे उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला बोलवत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज होऊन दरे गावी जाऊन बसतात. तोच कित्ता आता भाजपच्या राज्यमंत्र्यांकडून गिरवला जात आहे. सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या काही बैठका घेतल्या. त्यामुळे या खात्याचे मंत्री संजय शिरसाट संतप्त झाले आणि त्यांनी मिसाळ यांना खरमरीत पत्र पाठवले.
पत्रात काय म्हटले आहे
माझ्या असे लक्षात आले आहे की, जे विषय मंत्री सामाजिक न्याय यांच्याकडे वाटप करण्यात आलेले आहेत त्या विषयांच्या संदर्भातसुद्धा आपण आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन अधिकारी-कर्मचारी यांना विविध निर्देश देत आहात. यासंदर्भात माझ्या स्तरावर बऱ्याच बैठका आयोजित करण्यात येत असतात हेही आपल्याला माहितीच आहे. यास्तव प्रशासकीयदृष्टय़ा योग्य समन्वयासाठी जे विषय आपल्याला वाटप करण्यात आलेले आहे त्याव्यतिरिक्त इतर विषयांच्या बैठकांसाठी माझी पूर्वपरवानगी घ्या, असे शिरसाट यांनी पत्रात म्हटले आहे.
माधुरी मिसाळ म्हणतात…
या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे माधुरी मिसाळ यांनी संजय शिरसाट यांना ठणकावून सांगितले आहे.