
हुकूमशाहीविरोधात सर्व पक्ष एकवटत आहेत. तसेच संविधान आणि लोकशाहीविरोधी पक्षांची भाजपविरोधात एकजूट होत आहे. ही एकजूट अधिक मजबूत होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे जनतेचे मत आहे. तसेच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असून काही राजकीय निर्णय आहेत, ते होतील, असे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिले असून त्यात समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन वेगळा संदेश देऊ, असे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिले असून या संबंधीचा संदेश त्यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत. महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून म्हणजेच आपणाकडे पाहिले जात आहे, असे आव्हाड यांनी पत्रात म्हटले आहे.
मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी) आपणांस सविनय जयभीम !
मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 4, 2024
आपणाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील, यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे. आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

































































