…तुम्हाला शरद पवार समजलेच नाहीत; जितेंद्र आव्हाड यांचा प्रफुल्ल पटेल यांचा पलटवार

मला सत्तेत जायचेय म्हणून काय वाट्टेल ते करेन हे शरद पवारांना मान्य नव्हते. शरद पवार हे व्यक्ती आहेत जे चर्चेचे दरवाजे कधीच बंद करत नाही. याचा अर्थ तुम्ही इतके वर्षे शरद पवारांसोबत राहून तुम्हाला शरद पवार समजलेच नाहीत, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर पलटवार केला आहे. मला भाजपसोबत जायचे नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या भूमिकेबाबत कधीही शंका नव्हती, असेही आव्हाड म्हणाले.

असे असतानाही ते 50 टक्के ते भाजपसोबत जायला तयार होते, असे काहीजण म्हणातात. हा 50 टक्के शब्द आणला कुठून? प्रफुल्ल पटेल यांच्या डोक्यात काय आहे तेच शरद पवारांच्या मनात असले पाहिजे, असे काही नाही. 2004 मध्ये भाजपसोबत जावे, अशी प्रफुल्ल पटेल यांची इच्छा होती. तेच 2004 मध्ये मनात कुठलाही संकोच न बाळगता मंत्री झाले. माणूस संकोच तेव्हा करतो जेव्हा त्याला एखाद्या होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते. जेव्हा होणाऱ्या प्रकाराने दु:ख वाटते. तेव्हा तो संकुचित होतो. संकोच हा मनाच्या मर्यादा दाखवतो. पण हे सत्तेसाठी वाटेल ते करतील, असा पलटवार आव्हाड यांनी केला आहे.

तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवारांना संकोचित म्हणणे हास्यास्पद आहे. चर्चेत राहण्यासाठी तुम्हाला शरद पवारांचे नाव घ्यावे लागतात. शरद पवार कुठल्याही पक्षाचे नाव घेत नाही. पटेल शरद पवारांचे नाव घेतात आणि हेडलाईनमध्ये राहतात. पवार तुमच्याबाबत बोलत नाहीत मग कशाला तुम्ही शरद पवारांवर बोलता? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.