महायुतीत वादावादी सुरूच; लोकसभा निवडणुकीपूर्वीच नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागांवरून तिन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच महायुतीतील नेते एकमेकांवर जाहीरपणे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच जागावाटपावरून महायुतीत बेबनाव होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय होत नसल्याने इच्छुकांमधील अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे आता तिन्ही गटाचे नेते एकमेकांविरुद्ध जाहीरपणे वक्तव्ये करत निशाणा साधत आहेत.

बारामती मतदारसंघावरून शिंदे गटाने अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. बारामती मतदारसंघ म्हणजे पवारांचा सातबारा नाही, असे विजय शिवतारे यांनी सुनावले आहे. शिवतारे म्हणाले की, अजित पवार यांच्या उमेदवारासाठी प्रचार करण्याची आमची मानसिकता नाही. पवारांविरुद्ध बारामती मतदारसंघात साडेपाच लाख लोकांनी मतदान केले होते. बारामती हा काही पवारांचा सातबारा नाही. अजित पवारांनी मला कसा त्रास दिला, हे लोकांना माहिती आहे, तेच त्यांना धडा शिकवतील. संसदरत्न म्हणून पुरस्कार घेणाऱ्या सुप्रिया सुळेंनी मतदारसंघासाठी काहीही केलेले नाही. दोन्ही पवारांची कटकट संपवायची आहे, असे शिवतारे म्हणाले.

शिंदे गटाला भाजप दोन आकडीही जागा देणार नाही, अशी चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. आम्हाला सन्मानाने जागा द्या, नाही तर मग तुमचाही सन्मान राहणार नाही. सन्मानजनक जागा द्याव्याच लागतील, असे ते म्हणाले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे माजी आमदार आणि शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांनी अमरावतीची जागेवर दावा केला आहे. माझे वडील आनंदराव अडसूळ किवा मीच तिथे उमेदवार असेल, असे त्यांनी जाहीर केले. रवी राणा व नवनीत राणा बालिश आहेत, न केलेल्या कामांचे श्रेय लाटतात, असे ते म्हणाले.

या जागांसह कल्याणची जागा आम्हीच लढणार, असे म्हणत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला आधीपासूनच विरोध केला आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये उमेदवारीवरून भाजप विरुद्ध शिंदे गटात वादावादी सुरू आहे. ठाण्याच्या जागेवरूनही या दोघांमध्ये रस्सीखेच आहे. भंडारा-गोंदियाच्या जागेवर भाजप आणि अजित पवार गटाने दावा केल्याचे पेच आहे. गडचिरोलीतही तसेच चित्र दिसते. यवतमाळ-वाशिमच्या जागेवर महायुतीतील तिन्ही गटांनी दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच महायुतीमध्ये जुंपली आहे.