संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय दिला तर आमच्याच बाजूने लागेल; सुप्रिया सुळे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधिमंडळात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुणालाही विचारले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा असल्याचे सर्वांना माहिती आहे. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

कश्मीर ते कन्याकुमारी लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. शरद पवार या पक्षाचे संस्थापक आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या युक्तिवादादरम्यान सर्व बाबी आम्ही पारदर्शकपणे मांडल्या आहेत. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय जर दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने लागेल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात देशात अनेक कर्तुत्ववान लोक आहेत त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच कमतरता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. आरक्षण, महागाई, बेरोजगारी असेल अशी एवढे मोठे गंभीर प्रश्न राज्य आणि देशाच्या समोर आहेत. 200 आमदार आणि 300 खासदार असूनही हे प्रश्न तसेच आहेत, हे पूर्णपणे या सरकारचे अपयश आहे, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.