
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्ह्यातील हरिश्चंद्री येथे बोलताना अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांचाच पक्ष ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सर्व जनतेला माहित आहे. त्यांनी प्रेमाने पक्ष मागितला असता तर आम्ही तो दिलदारपणे दिला असता, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. चिन्ह आणि पक्ष हे शरद पवार यांचेच आहेत. आमची त्यांच्याशी तत्त्वाची लढाई आहे. प्रेमाने मागितलं असतं तर आम्ही दिलदारपणे दिलं असतं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहेत. आम्ही महाराष्ट्राचे वाटोळे करू, असे अदृश्य शक्तींना वाटत असेल तर ते आम्ही करू देणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी ठणाकावले.
माझ्यापुढे दोन मार्ग होते. एका बाजूला सत्ता आणि अदृश्य शक्ती होती. तर दुसऱ्या बाजूला विचार, संघर्ष आणि वडील होते. सुप्रिया सुळे नेहमी संघर्ष निवडते. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी वंदनीय आहेत. उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनीच शिवसेना पक्ष स्थापन केला. बाळासाहेबांनींच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष दिला. 10 वर्षे काम पाहून आपण सर्वांनी उद्धव ठाकरे यांना नेता मानलं. पण अदृश्य शक्तीने काय जादू केली माहिती नाही. त्यामुळे आपल्यासाठी एकच शिवसेना आहे. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. ज्यांनी चोरून नेलं आहे, त्याला काही किंमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही हेच लागू होते, असेही त्यांनी सांगितले.



























































