
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार विलास पोतनीस यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत कर्मचाऱयांच्या विविध प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमदार पोतनीस यांना संघटनेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारावा, अशी विनंती कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.
वर्तमानात कर्मचाऱयांच्या निवृत्तीनंतर वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि निवृत्ती वेतन या प्रमुख मागण्यांवर संघटना काम करीत असून, याअनुषंगाने या महत्त्वाच्या मागण्यांबरोबरच अन्य काही मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन पोतनीस यांनी केले आहे.
कर्मचारी, प्रशासन, संस्था आणि कामकाज या महत्त्वाच्या बाबी असून, यांच्या समन्वयातून कर्मचाऱयांना उज्ज्वल भविष्यासाठी दिलासा मिळेल, असे कामकाज आपण करू, असे विलास पोतनीस यांनी म्हटले आहे. संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे (आयएएस) यांची विलास पोतनीस यांनी सदिच्छा भेट घेतली.
या वेळी संघटनेचे सरचिटणीस प्रवीण पाटील, उपाध्यक्ष उदय मयेकर व संजय नार्वेकर, रमेश तावडे, चिटणीस, सहसचिव दत्ताराम गावकर, दिलीप मोहित, विजय म्हात्रे, चंद्रकांत धनू, खजिनदार दिनानाथ राणे, शोभना नाईक, सहखजिनदार, कार्यकारिणी सदस्य जय हडकर, रोहन कडवईकर, महेश लोखंडे, धैर्यवान रुमडे, जयसिंग भोसले, तुकाराम अंबाजी, विठ्ठल बडे, विजय सकपाळ, संदीप महाडिक, दीपक खरीवले, अमृता जावकर आदी उपस्थित होते.






























































