रासायनिक पाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ, ठाणे-रायगड जिल्ह्याला धोका; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंची कबुली

एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या प्रदूषणात वाढ झाल्याची कबुली पर्यावरण व वातावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

प्रशांत ठाकूर व अन्य सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तळोजा एमआयडीसीतील घातक व रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीत आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर, डेंबिवलीतील एमआयडीसीमधील अनेक कंपन्या तसेच जीन्स वॉश करणाऱ्या पंपन्या रसायनमिश्रित पाणी वालधुनी व उल्हास नदीत सोडत  असल्याने नद्यांच्या प्रदूषणात मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊन नागरिक, शेती तसेच जलचरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असल्याबद्दल प्रश्न केला होता. त्यावरील लेखी उत्तरात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंशतः खरे असल्याचे मान्य केले आहे.

मुळा-मुठा-इंद्रायणीला धोका

पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी, भीमा नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी, प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या जलपर्णीमुळे नागरिकांचे व जलचरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पंकजा मुंडे यांनी अन्य एका प्रश्नावरील लेखी उत्तरात मान्य केले आहे.