
शालेय शिक्षण विभागाने या वर्षीपासून पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णावर संमिश्र मते व्यक्त होत आहेत. पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसविण्यास काहींचा विरोध आहे. तरी काहींनी आठवीपर्यंत सर्वच वर्गाची परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढले, असे मतही व्यक्त होत आहे. नापास न करण्याच्या धोरणामुळे शालेय जीवनात स्पर्धा, पुढे जाण्याची इच्छाशक्तीच विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नसल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे.
आरटीई अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक नाही. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य नाही, असे असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केले. सध्या पाचवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्याची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थी पाचवीत नापास झाल्यास तो फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होईल याची शाश्वती नाही. त्यातून नापास झालेली ही मुले शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडतील. त्यातून शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढेल, असेही ते म्हणाले.
परीक्षा घेण्याचा निर्णय योग्यच
शाळेतील मुलांची खालावलेली पातळी, अपुरी शिक्षक संख्या, न शिकवता शून्य गुणांवर गुण चढवून पास करणे. प्रगतिपुस्तकातील शेरे आणि प्रत्यक्ष मूल याचा काडीचाही ताळमेळ न बसणे असे असंख्य गैरप्रकार शाळांमध्ये सुरू आहेत. नापास होण्याची भीती नसल्याने पालकही बिनधास्त वागतात. काही विद्यार्थी तर परीक्षांना दांडय़ा मारूनही रूबाबात वरच्या वर्गात प्रवेश मिळवतात, असे असंख्या अनुभव येत असल्याचे शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
परीक्षा पद्धत बदलण्याची गरज
शालेय परीक्षा पद्धत बदलण्याची गरज आहे. सध्याच्या परीक्षेतून मुलांची चौकस बुद्धी, सर्जनशीलता, शिकलेल्या गोष्टींची दैनंदिन अनुभवांना सांगड घालणे या गोष्टी तपासल्या जात नाहीत. सध्याच्या परीक्षा पद्धतीत केवळ माहिती विचारली जाते आणि मुले उत्तरे पाठ करून ती लिहितात. परीक्षा घ्यायला हरकत नाही; पण त्या परीक्षेच्या आधारावर पाचवी आणि आठवीत विद्यार्थी नापास झाल्यास होणाऱ्या परिणामांचा विचार करणेदेखील आवश्यक आहे, अशी मागणीही शिक्षणक्षेत्रातून होत आहे.
दहावीचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी नववीत विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळा आता पाचवीतच विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील.
या निर्णयामुळे खासगी शिकवण्या लावण्याचे प्रमाण वाढेल. क्लास लावायचे प्रमाण वाढेल.
पाठय़पुस्तकांचे चार भाग केले आहेत. पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षा केवळ चौथ्या भागावर घेणार का?
या निर्णयामुळे शाळाबाह्य प्रमाण वाढू शकते. सध्या आठवीपर्यंत तरी मुली शिकायच्या. आता पाचवीतच त्यांचे शिक्षण थांबेल.






























































