राज्यात किमान तापमानाचा पारा घसरतोय, संभाजीनगर येथे सर्वाधिक किमान तापमानाची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील परतीच्या पावसाचा प्रवास संपतो ना संपतो तोच थंडीने सर्वांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील बहुतांश शहरांतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होण्यास सुरुवात झाली असून, आज (दि. 31) राज्यामध्ये सर्वाधिक किमान तापमानाची नोंद संभाजीनगर येथे 13.3 अंश सेल्सिअस एवढी झाली. पुणे आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे 13.4 अंश सेल्सिअस एवढय़ा किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे महाबळेश्वरप्रमाणेच पुणेशहरदेखील गारठले आहे.

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात थंडीची चाहूल लागली आहे. परतीच्या पावसाने राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातल्यानंतर आता यंदा थंडीचा कडाका अधिक जाणवणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेबरोबर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे.

दिवाळीच्या दिवसांपासून राज्यातील विविध शहरांमधील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होण्यास सुरुवात झाली. पुणे शहरासह आसपासच्या परिसरातील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये सातत्याने घट होत आहे. सोमवारी (दि. 31) शहरात 13.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान

पुणे 13.4, रत्नागिरी 19.4, जळगाव 14.5, कोल्हापूर 17.4, महाबळेश्वर 13.4, नाशिक 13.6, सांगली 15.8, सोलापूर 17.0, परभणी 15.9, नांदेड 17.0, अकोला 17.7, गोंदिया 15.6, नागपूर 15.0.