
लोककला म्हटले की शाहीर साबळेंचे नाव आपसूकच डोळय़ांसमोर उभे रहाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पोहोचवले. शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाटय़ाचे लेखक, नाटय़दिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि ढोलकीवादक अशा अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला भेटत राहिले. अशा या बहुआयामी कलावंताची गोष्ट ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
रविवार 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहता येणार आहे. अंकुश चौधरी याने चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका केली आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ अशी तगडी कलाकारांची फौज चित्रपटात आहे.



























































