
वरच्या सभागृहाने सांगायचं मंत्री खाली आहेत आणि खालच्या सभागृहाने सांगायचं मंत्री वर आहेत. आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहात, असे खडे बोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्र्यांच्या गैर हजेरीवरून सत्ताधाऱ्यांना सुनावले. अजित पवार यांच्या आक्रमक आणि हजरजबाबी स्वभावाची क्षणाक्षणाला प्रचीती येत असून अजितदादा को गुस्सा क्यों आता है! अशीच काहीशी चर्चा आहे.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्यादरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर सभागृहात उपस्थित नसल्याच्या मुद्दय़ावरून अजित पवार चांगलेच संतापले. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आहेत, असं मत मांडले. त्यावर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री आहेत, म्हणून इतर मंत्र्यांनी हजर राहायचं नाही का? उत्तर कोण देणार आहे, असा संतप्त सवाल करताच विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांना बोलविण्याच्या सूचना सरकारला दिल्या.
काय शंभुराज, तुम्ही नवीनच!
आदिवासी विकास मंत्री नसल्याच्या मुद्दय़ावर मंत्री शंभुराज देसाई यांनी विजयकुमार गावीत आता होते, असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताच अजित पवार संतापून म्हणाले, ‘अरे, आता होते काय, तिथं बसायला पाहिजेना? काय शंभूराजे, तुम्ही नवीनच असल्यासारखं करत आहात, असा टोला लगावला.
भाजपच्या अभिमन्यू पवारांना समज
विधानसभेत प्रश्न विचारू दिला नाही म्हणून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तालिका अध्यक्षांशी हुज्जत घातली. त्यांचा आवाज चढताच लागलीच अजित पवार उभे राहिले आणि तालिका अध्यक्षांना धमकावू नका. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही वेगळी आयुधं वापरा, अशी समज दिली. अजित पवार यांचा रुद्रावतार पाहून अभिमन्यू पवार यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुनावले
लक्षवेधीवर विधानसभेऐवजी विधान परिषद असे लिहिण्यात आले. यावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. ही ज्याची कोणाची चूक आहे, त्याने यावर दिलगिरी व्यक्त करावी. तुम्ही फुकट काम करत नाही. यासाठी तुम्हाला सरकार सातवा वेतन आयोग देते. यापुढे अशी चूक झाल्यास त्यांना निलंबित करा.






























































