
24 एप्रिल 2021 रोजी होत असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज गुरुवारी निवृत्त न्यायाधीश एस. एन. सरदेसाई यांच्याकडे सादर करण्यात आला.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकडून अजित पवार यांचे नाव सुचविण्यात आले होते, परंतु अजित पवार हे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष असल्याने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव सर्वानुमते देण्यात आले. हिंदुस्थानी ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र घुले, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव अस्वाद पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य बाबूराव चांदेरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यालयीन सचिव सचिदानंद भोसले व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे इत्यादी मान्यवरांनी अजित पवार यांच्या वतीने अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
































































